Details of Swine Flu by Dr. Amol Annadate (from Lokprabha)

लोकप्रभा मधून :

http://www.loksatta.com/lokprabha/20090904/arogya.htm

स्वाइन फ्लूबद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे प्रसिद्धीमाध्यमांपासून ते सर्वसामान्य सुदृढ माणसांमध्ये भीतीची एक साथ फैलावली असल्याचं चित्र दिसतंय. स्वाइन फ्लूच्या घातकतेबद्दलचे गैरसमज आणि त्याच्या लक्षणांपासून ते उपायांपर्यंतची माहिती मराठीत प्रथमच.

डॉ. अमोल अन्नदाते

सध्या प्रसारमाध्यमांनी स्वाइन फ्लूवरच्या बातम्यांमुळे त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या डोळ्यांवर अपुऱ्या माहितीची पट्टी बांधून ‘स्वाइन फ्लू’च्या रेल्वे ट्रॅकवरून धावण्यास भाग पाडले आहे. पण या ट्रॅकवरून एवढय़ा मोठय़ा संख्येने रेल्वेगाडय़ा काही जीवन घेण्यासाठी धावत नाही आहेत आणि आपण सर्वजण या संकटातून सहीसलामत बाहेर येऊ हे सर्वसामान्यांना कोणीतरी पटवून सांगायला हवे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी या आजाराविषयी लोकांची भीती घालवायला हवी, तेही सर्दी, खोकला, ताप आला तरी धाय मोकलून रडताहेत. म्हणून ‘स्वाइन फ्लू’ची साथ नक्की संपेल, पण भीतीच्या साथीने कितीतरी लोक रोज मरत आहेत.

त्यातच प्रसारमाध्यमांकडून जनजागृती करण्याच्या उत्साहात जी अपूर्ण माहिती दिली जात आहे त्यामुळे बाजारबुणग्यांची आणि काही प्रमाणात डॉक्टरांची चांदी होते आहे. जागरूक राहून खबरदारी घेणे वेगळे आणि भीतीपोटी उपाययोजनांचा नाहक अतिरेक करणे वेगळे. त्यासाठी या आजाराविषयी प्रकर्षांने पुढे न आलेल्या काही गोष्टी समजून घ्यायला हव्या. तसेच सध्या प्रसारमाध्यमांमधून खबरदारीच्या उपायांचा प्रचार सुरू आहे, त्यातल्या त्रुटी समजून घ्यायला हव्या.

सर्वसामान्यांच्या दृष्टीने सर्वात भीतिदायक गोष्ट ही आहे की, या आजारामुळे आतापर्यंत १५ ते २० जणांचा बळी गेला आहे. मृतांबद्दल सर्वानाच दु:ख वाटते आणि स्वाइन फ्लूच काय, पण कुठल्याही आजाराने कोणाचाच बळी जायला नको. पण या आजाराचे रिपोर्टिग अशा पद्धतीने झाले आहे की, ‘स्वाइन फ्लू’च्या प्रत्येक रुग्णाचा बळी जाणार आहे. घराघरांतून तीनचार तिरडय़ा बाहेर पडतील आणि प्रेतांची विल्हेवाट लावायलाही माणसे उरणार नाहीत, असे चित्र उभे केले आहे? वास्तविक तसे काहीही नाही आणि तुम्ही कुठल्याही आजाराचे रिपोर्टिग केले तरी तो आजार ‘स्वाइन फ्लू’ पेक्षा भयानक आहे असे लक्षात येईल. जरा पुढील आजारांविषयीच्या गोष्टींवर दृष्टिक्षेप टाका.

१) भारतात दर मिनिटाला ५ बालकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी ६० टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होतात, पण म्हणून जन्मानंतर पहिल्या वर्षी काय अन्न घ्यावे हे कोणीही बातम्यांमध्ये दाखवणार नाही.

२) दर तासाला एक व्यक्ती मलेरियाने मरण पावते, पण कोणीही मच्छरदाणीचा प्रचार रोज बातम्यांमध्ये करत नाही.

३) टी.बी. हे मृत्यूचे पहिले कारण आहे व हे गेल्या ५० वर्षांपासून आहे, पण म्हणून रस्त्यावर थुंकू नये आणि खोकताना तोंडावर हात ठेवावा हे कळण्यास स्वाइन फ्लूचा मुहूर्त कशाला हवाय.

४) अपघात हे मृत्यूचे सहावे कारण आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे म्हणून आजारी व्यक्तीपासून लांब राहावे. हे खरे असले तरी पुण्यामध्ये कर्फ्यूसदृश वातावरण आहे. घबराट पसरवून लोकांना खबरदार केले जाऊ शकते, पण ड्रायव्हिंग करताना नियम पाळावे हे समजून सांगूनही कळत नाही.

५) स्वाइन फ्लू होईल की नाही हे नक्की नाही, पण कंडोम न वापरता संभोग केल्यास एचआयव्ही बाधा होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून आम्ही ‘मास्क

घालू पण कंडोम न वापरता स्वैर वागू’ असे झाले आहे.

दुसरे म्हणजे या आजारामुळे २० बळींच्या संख्येचा एवढा बाऊ केला जातोय, पण सध्या एन्फ्ल्यूएन्झामुळे दरवर्षी ३००० मृत्यू होतात. साध्या फ्लूच्या व

स्वाइन फ्लूच्या मृत्युदरात काहीही फरक नाही. तसेच काही मृत्यू झाले असले तरी शनिवार, १५ ऑगस्टपर्यंत ६७८ व्यक्ती यशस्वीपणे उपचारानंतर घरी गेल्या

आहेत हेही बघायला हवे. ही साथ व हा जंतू नवा असला तरी प्रत्येक साथीची एक ‘Natural History’ असते. स्वाइन फ्लूच्या साथीचा नैसर्गिक इतिहास :

खरेतर स्वाइन फ्लू ही प्रसारमाध्यमांसाठी आता ब्रेकिंग न्यूज ठरली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिलमध्येच ‘फेज ६ पॅन्डेमिक’ जाहीर केले

आहे. ‘फेज ६ पॅन्डेमिक’च्या व्याख्येचा अर्थच कोणी समजून घ्यायला तयार नाही, म्हणून सगळा अनर्थ होतोय. याचा अर्थ हा आजार पूर्ण जगात पसरू शकतो, पण या आजाराचा मृत्युदर अत्यंत कमी असेल. तसेच कुठलीही साथ आली की सुरुवातीच्या दिवसांत काही मृत्यू होतात आणि नंतर लगेचच मृत्यू बंद होतात, पण साथ सौम्य स्वरूपात काही दिवस सुरू राहते. कॉलराची काही वर्षांपूर्वी मोठी साथ आली होती व सुरुवातीला काही मृत्यू झाले. ‘एलटॉर’  जातीच्या कॉलराची ही साथ अजूनही सुरू आहे, पण त्याची चर्चा होते का? कारण मृत्यू बंद झाले व ही साथ चालू असली तरी कमी झाली. ‘स्वाइन फ्लू’चेही तसेच होईल. काही दिवसांनी ‘स्वाइन फ्लू’च्या बातम्या आतल्या पानांवर सरकायला सुरुवात होईल. कुठल्याही साथीबद्दल किंवा ‘स्वाइन फ्लू’बद्दल असे का होते ते समजून घेऊ या? कुठल्याही आजारामध्ये अनेक लोकांना जंतूसंसर्ग होऊन ते पूर्ण बरे होतात तेव्हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होते व ती हवेवाटे निसर्गात सोडली जाते. याला ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतात. पुढे जाऊन या जंतूसंसर्गातूनही ती प्रतिकारशक्तीही पसरवली जाते व म्हणून नंतर मृत्यू आणि कॉम्प्लिकेशनही कमी होतात, मृत्यू कमी होतात. पण सध्या औषधांबद्दल अविचारी धोरण वापरून या नैसर्गिक प्रतिकार शक्तीतही कसा हस्तक्षेप केला जातोय ते पुढे पाहूया. स्वाइन फ्लू झाल्यावर रुग्णाला नेमके काय होते? एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी, स्वाइन फ्लू हा व्हायरल आजार आहे आणि कुठलाही व्हायरल आजार हा बहुतांश वेळा कुठल्याही औषधांशिवाय बरा होतो.

स्वाइन फ्लूही या गोष्टीला अपवाद नाही आणि तुम्हाला स्वाइन फ्लू झाला तरी तुम्ही ९९.९९ टक्के बरे व्हाल हे निश्चित. ०.१ टक्के तर कुठल्याच आजाराचे काही सांगता येत नाही. म्हणूनच लोकांना ‘स्वाइन फ्लू’ची भीती घालणे म्हणजे तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता आणि बिल्डिंग कोसळतात म्हणून तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा तुम्ही वाहन चालवता म्हणजे तुमचा अपघातात मृत्यू होऊ शकतो असे म्हणण्यासारखे आहे.

‘स्वाइन फ्लू’मुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल काही गोष्टी :

स्वाइन फ्लूने २० जणांचा बळी घेतला असला तरी या मृत्यूचे प्राथमिक कारण हे फक्त आणि फक्त ‘स्वाइन फ्लू’च्या साथीच्या वेळी झालेल्या मृत्यूबद्दल डॉ. क्लूगमन यांनी अभ्यास करून अशी गोष्ट समोर आली की ‘हिमोफिल्स’ व ‘न्यूमोकोकाय’ या बॅक्टेरियामुळे बहुतांश मृत्यू झाले होते. या वेळीही न्युमोनियामुळेच मृत्यू झाले आहेत. ‘स्वाइन फ्लू’ स्वत: मृत्यू घडवून आणत नाही तर सहसा सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे इतर जंतूसंसर्गामुळे मृत्यू होतो.

‘हीब’ ही लस सगळ्यांना द्यावी असे अनेक वर्षांपासून सांगितले जाते. ही सूचना अनेक वर्षांपासून पाळली असती तर या जंतूंचा संसर्ग होऊन ‘स्वाइन फ्लू’चे अर्धे मृत्यू तरी टळले असते. पण १९१८ साली दिलेली ही सूचना दुर्लक्षित राहते, कारण प्रसारमाध्यमांनी ‘किती बळी गेले?’ या ब्रेकिंग न्यूजमध्येच रस असतो.

दुसरा प्रश्न म्हणजे स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे व ६७८ व्यक्ती बाधित आहेत. त्यांच्याकडून हा आजार काहीजणांना तरी पसरला असणार आहे. मुंबईतील ४० टक्के जनता तर अगदी गलिच्छ (शौचालयांच्या बाजूला) राहते. मग या व इतर सर्व जनतेमध्ये तर स्वाइन फ्लूमुळे प्रचंड मृत्यू व्हायला हवे? हे लोक या जंतूसंसर्गाला एक्स्पोझ झालेले नाहीत? की ते रुग्णालयात दाखल होत नाही आहेत की त्यांच्याकडे मीडियाचे लक्ष गेले नाही? मुळात सत्य हे आहे की स्वाइन फ्लूचा मृत्यू दरच कमी आहे. मृतांच्या संपर्कात आलेल्यांचे काय झाले? मृत व्यक्तींकडून ‘स्वाइन फ्लू’चा कमीत कमी घरातील व्यक्तींना तरी प्रादूर्भाव व्हायला हवा, पण तसे झालेले नाही. यात एक शक्यता अशी आहे की यातील काहींना सबक्लिनिकल (म्हणजे लक्षणे न दिसता) जंतूसंसर्ग झालेला असेल व त्यांच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल तर तुम्ही का घाबरताय?

प्रतिबंधक उपायांबद्दलचा गोंधळ :

१) सध्या हात धुवा, शिंकताना-खोकताना तोंडावर रुमाल लावा आणि आजारी माणसांपासून लांब राहा हे स्वाइन फ्लूच कशाला अनेक वर्षांपासून अनेक आजारांच्या प्रतिबंधासाठी सांगितलेले गेलेले नियम आहेत. स्वाइन फ्लूची साथ गेली तरी आयुष्यभर हे नियम पाळायला हवेत.

२) ‘मास्क’ हिस्टेरिया :- सध्या सुरू असलेला मास्कचा प्रचार हा या साथीचा सगळ्यात हास्यास्पद भाग आहे. आपण मास्क वापरून जीवनमरणाची लढाई जिंकलो अशा आविर्भावात लोक वावरत आहेत.

सर्वप्रथम मास्कच्या वापराबद्दल पुढील गोष्टी समजून घ्या :-

१) मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे तर आपल्याकडून इतरांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून केला जातो. डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये स्वत:च्या तोंडातील जंतू रुग्णांकडे जाऊ नये म्हणून वापरतात. ‘स्वाइन फ्लू’चा निश्चित किंवा संशयित म्हणजेच सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतूसंसर्ग होणार असेल तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो.

२) जागतिक आरोग्य संघटनेने व सी.डी.सी. (सेंटर फॉर डीसिज कंट्रोल)ने या प्रतिबंधासाठी फक्त एन ९५ हाच मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दर चार तासांनी मास्क थुंकीने ओला होता व तो बदलावा लागतो. भारतासारख्या देशात दर चार तासांनी ५०० रुपयांचा मास्क वापरणे कसे शक्य आहे?

३) जर मास्क वापरायचाच असेल तर तो २४ तास वापरायला हवा. हा मास्क लावल्यावर इतके गुदमरायला होत असताना व स्वस्थ व्यक्तींना या मास्कची गरज नसताना प्रत्येकजण मेंढरांसारखे मास्क लावून फिरत आहेत. प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मास्क वापरासंदर्भात अग्रलेख लिहिले जाऊ लागले आहेत.

४) मास्कच्या अपप्रचारामुळे मास्कचा अपप्रचार वाढला. लोक सतत व रोज तोच तो मास्क वापरल्यामुळे त्यातून स्वाइन फ्लू नव्हे, पण इतर जंतूसंसर्गाची जास्त शक्यता आहे. लोक खाली पडलेले मास्क वापरत आहेत. एकमेकांचे मास्क वापरत आहेत. स्वाइन फ्लूचे जंतू हे हवेतही असू शकतात हे माहीत नसल्याने फक्त गर्दी दिसली तरच मास्क लावत आहेत. तसेच अर्धवट लावलेले, नाक सोडून फक्त तोंडावर असलेले मास्कही दिसत आहे. एके ठिकाणी तर दोन मास्क लावलेल्या लोकांनी जवळ येऊन कानात कुजबुज करताना तोंडावरचे मास्क काढल्याचे दृश्यही मला दिसले. काही उच्चभ्रू मंडळी वेगवेगळी चित्र असलेली डिझायनर मास्क वापरत आहेत.

औषधांबाबतचा गोंधळ व गैरसमज ‘स्वाइन फ्लू’साठी ऑसेल्टामीवीट आणि झानामावीट ही दोन औषधे उपलब्ध आहेत.

खरे तर आधी सांगितल्याप्रमाणे ‘स्वाइन फ्लू’ हा आपोआप बरा होणारा आजार आहे. जे लोक बरे झाले ती औषधे घेतली नसती तरी बरे झाले असते व जे मृत्यू पावले त्यांना औषध देऊनही मृत्यू आला. कारण वर सांगितल्याप्रमाणे मृत्यूचे कारण हे सेकंडरी इन्फेक्शनही असू शकते. मग औषधांचा एवढा बाऊ

कशासाठी? लोक औषधांसाठी एवढे आतूर झाले आहेत की, विमानतळावरून औषधांची चार पाकिटे लंपास झाली. जिल्हा रुग्णालयात आलेली औषधे आमदार, खासदार यांच्या कुटुंबासाठी व त्यांचा जॅक लावून मिळवली जात आहेत. जणू काही ही औषधे हलाहल विषयावरील समुद्रमंथनातून मिळविलेले अमृत आहे. या भ्रमात सगळे वावरत आहेत. ही औषधे बाजारात उपलब्ध झाल्यावर त्यांना मिळविण्यासाठी एवढी गर्दी उसळेल की त्या चेंगराचेंगरीत स्वाइन फ्लूपेक्षा जास्त लोक मरतील. तसेच या औषधाचा एक विवादास्पद दुष्परिणाम आहे आणि तो म्हणजे औषध घेतल्यावर स्वत:ला इजा करण्याची इच्छा होणे. जपानमध्ये असे आढळून आल्यामुळे मार्च, २००७ मध्ये हे औषध १० ते १९ वयोगटातील मुलांना देऊ नये असा निर्णय सरकारने घेतला. आधी सांगितल्याप्रमाणे ९९ टक्के ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांना औषधाची गरज नाही. जर न्यूमोनिया, जुलाब आढळले तरच उपचारांची गरज आहे. त्यातही लक्षणे सुरू झाल्यावर दोन दिवसांत दिल्यास ते जास्त परिणामकारक ठरते. जर सर्वसामान्यांसाठी हे औषध खुले केले तर गरज नसलेले ९९ टक्के लोक व इतर सर्व प्रतिबंधासाठी पुढचामागचा विचार न करता हे औषध खातील. त्यामुळे अनेकांना सौम्य स्वरूपाचा जंतुसंसर्ग होऊन, त्यातून जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल ती साथ नियंत्रणात आणण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. पण सौम्य जंतुसंसर्ग आणि प्रतिबंधासाठी सगळ्यांनीच ही औषधे खाल्ली तर या नैसर्गिक प्रतिकारशक्तीमध्ये तो हस्तक्षेप ठरेल आणि साथ अजून रौद्र रूप धारण करू शकेल. तसेच यामुळे औषध गरज असलेल्यांसाठी निकामी ठरून ‘ड्रग रेझिस्टंट’ औषधांना रिस्पॉन्स न देणाऱ्या फ्लूच्या जाती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे औषधाच्या काळाबाजाराला वाव आहे व गरज नसताना भरपूर गोळ्या खरेदी करण्याच्या वृत्तीलाही खतपाणी मिळेल.

सध्या या औषधाचा तुटवडा असल्याने त्याबद्दल एवढी उत्सुकता आहे. मलेरियाची औषधे उपलब्ध असताना ती कोणी घेत नाही. या औषधांचा तुटवडा असल्याचे जाहीर केले तर लोक ती औषधे खरेदी करण्यास केमिस्टकडे धाव घेतील ही भारतीयांची मानसिकता आहे.

साथीमध्ये डॉक्टरांचीही पीछेहाट :

‘स्वाइन फ्लू’च्या साथीमध्ये जनता भयभीत झालेली असताना रुग्ण तपासून झाल्यावर फॅमिली डॉक्टर सर्दी, खोकल्याच्या रुग्णांना स्वाइन फ्लू असेल

तर मी सांगू शकत नाही असा शेवटी पवित्रा घेतात आणि थेट सरकारी रुग्णालयांमध्ये धाडतात. त्यामुळे स्वाइन फ्लू तपासणी केंद्रांवर रुग्णांची प्रचंड गर्दी उसळली आहे. रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये धाडण्याअगोदर पुढील व्याख्या प्रत्येकाने लक्षात घ्यावी. स्वाइन फ्लू संशयित रुग्णाची व्याख्या :

३८ अंश सेल्सियसपेक्षा जास्त ताप आणि सर्दी, खोकला अशी लक्षणे सात दिवसांच्या आत स्वाइन फ्लू रुग्णाच्या संपर्कात आल्यावर सुरू झाली असल्यास किंवा सात दिवसांमध्ये स्वाइन फ्लू निश्चितपणे आढळलेल्या कम्युनिटीत प्रवास झाला असल्यास.

फक्त वरील व्याख्येत बसणाऱ्यांनीच जाऊन तपासणी करून घ्यायला हवी.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या आयसोलेशनचा फार्स :

आपण दूरचित्रवाणीवर ज्या रुग्णांना स्वाइन फ्लू झाला त्यांना आयसोलेट केले म्हणजे त्यांच्याकडून इतरांना जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून ठेवलेला वॉर्ड बघितला. काही चॅनल्सवर तर थेट खिडकीतून त्या रुग्णांनाही दाखविण्यात आले. अशा रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेले निर्देश बघितल्यावर या आयसोलेशनचा फार्स लक्षात येईल. अशा एका रुग्णाला एकाच खोलीत ठेवून त्या खोलीचे दार व खिडक्या बंद ठेवाव्यात व खोलीत दर तासाला केवळ ६ ते १२ एअर एक्स्चेंजेस् जायला हवे व एक्झॉस्टद्वारे बाहेर येणारी हवा High Efficiency Particulate Air Filter (HEPA) द्वारे शुद्ध करूनच बाहेर सोडली जावी.

स्वाइन फ्लूची लस :

सध्या ‘स्वाइन फ्लू’च्या लशीबद्दल सर्वत्र विचारणा होते आहे. लोकांच्या मनातील भीती एन्कॅश करण्यासाठी व आपली पोळी भाजून घेण्यासाठी फार्मा इंडस्ट्रीही सज्ज आहे. खरे तर ही लस अजून बाजारात आलेली नाही. आली तरी ती कितपत प्रभावी असेल हेही ठाऊक नाही. दुसरे म्हणजे स्वाइन फ्लूचा विषाणू सतत स्वत:मध्ये जनुकीय बदल घडवून व रूप बदलून समोर येणारा विषाणू आहे. म्हणून आता घेतलेली लस ही पुढील साथींमध्ये प्रभावी ठरणार नाही हे निश्चित. तरीही उगीचच या लशीबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. स्वाइन फ्लूच्या लसीबरोबरच फारशी प्रभावी नसलेल्या साध्या फ्लूचेही मार्केटिंग सुरू आहे. नुकतेच मला एका अशाच फार्मास्युटिकल कंपनीच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचा फोन आला. ‘‘सर, लोक फ्लूच्या नावावर बरेच घाबरलेले आहेत, चांगली संधी आहे, आपण साध्या फ्लूच्या लशीचा कॅम्प घेऊ या.’’

एका गोष्टीची मोठी गंमत वाटते. गोवर, टी.बी., धनुर्वातसारख्या आजारांमुळे आजही लाखो बालकांचे जीव जात आहेत आणि या लशी उपलब्ध होऊन कितीतरी वर्षे झाली तरी त्या कोणी घेण्यास तयार नाही. ५० वर्षांनंतरही ५० टक्के मुलांना सगळ्या लशी मिळालेल्या नाहीत, पण तरीही स्वाइन फ्लूच्या लशीबद्दल एवढी

उत्सुकता. ताप आल्यावर स्वाइन फ्लूपेक्षा टायफॉइड असण्याची शक्यता जास्त पण तरीही कोणी टायफॉइडची लस घेणार नाहीत, पण गुगलवर स्वाइन फ्लू लशीबद्दल माहिती घेतील याला काय म्हणावे?

१९७६ च्या अमेरिकेतील स्वाइन फ्लू साथीनंतर असाच लशीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला व ४० दशलक्ष लोकांना लस दिली गेली. पण लशीकरणानंतर ४० जणांना पायापासून खाली अधूपणाचा आजार म्हणजे ‘गया-बाटी सिंड्रोम’ हा आजार झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दर एक दशलक्षामागे एकाला होणाऱ्या या लशीच्या दुष्परिणामाकडे अजून कोणाचेही लक्ष गेलेले नाही. आजाराचा फैलाव रोखण्यास सरकार तरी काय करणार?

या आजाराचा फैलाव रोखण्यास सरकार अपयशी ठरले अशी सगळीकडे टीका झाली. आरोग्यमंत्र्यांचे राजीनामे मागितले गेले. कुठल्याही व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी एक दिवस आधीच रुग्ण इतरांना जंतुसंसर्ग करण्यास सुरुवात करतो. ताप येण्यापूर्वीच आठ-दहा शिंका देऊन विषाणूचा प्रसाद शे-सव्वाशे लोकांना वाटून रुग्ण मोकळा होतो. शिवाय लक्षणे न दिसणारी पण तरीही इतरांना आजार पसरविण्याची क्षमता असणारी सबक्लिनिकल केसेस्ही आहेतच. आता सरकार आणि आरोग्यमंत्री काय सरसकट सगळ्या लोकसंख्येची नाके-तोंडे दाबून धरणार आहे का? आपण अनेक वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतेच्या साध्या

नियमांकडे दुर्लक्ष करत आलो. त्यासाठी सरकारला कसे जबाबदार धरणार? धडे स्वाइन फ्लूचे या काही दिवसांमध्ये आपण बघितले की प्रसारमाध्यमांनी स्वाइन फ्लूमुळे होणारे मृत्यू उचलून धरले. टी.व्ही.वर सतत स्वाइन फ्लूच्या बातम्या झळकत होत्या. जनजागृतीच्या दृष्टीने काही गोष्टी गरजेच्या होत्या, पण आपण मृत्यूच्या कारणांकडे दृष्टिक्षेप टाकू या. मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोग (१९%), दम्यासारखे फुफ्फुसाचे आजार (९%), अतिसार (८%), न्यूमोनिया (७.२%), टी.बी. (६%) आणि कॅन्सर (५.७%). या बहुतांश आजारांमध्ये कुपोषण हा एक समान धागा आहे. स्वाइन फ्लूही कुपोषित आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांवर आधी झडप घालत होता. हरणाच्या मागे या सर्व आजारांचा वाघ आहेच, स्वाइन फ्लूचा वाघही मागे लागला म्हणजे दोन वाघ या हरणाच्या मागे लागले तर शिकार निश्चित आहे, हा धडा सर्वप्रथम आपण घ्यायला हवा. रोज भारतात ३७५३ लोक फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू पावतात. १९७३ लोक अतिसारामुळे व १४७९ लोक टी.बी.ने मृत्यू पावतात. म्हणून २० बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूसोबत यांच्यावरही प्रसारमाध्यमांमध्ये तेवढीच चर्चा व्हायला हवी.

कुठल्याही नव्या आजाराबद्दल समाजात अचानक घबराट पसरणे भारतासारख्या देशात नवे नाही. २००२-०३ मध्ये अशीच सार्सची भीती निर्माण झाली, पण अख्ख्या जगात ८०९६ लोक बाधित आढळले आणि ही साथ शांत झाली. तसेच १९९४ मध्ये सुरतमध्ये प्लेगविषयी घबराट पसरली. हजारो लोक सुरत सोडून गेले. एकटय़ा सुरतमध्ये २६० दशलक्ष डॉलरएवढे आर्थिक नुकसान व्यवसायांमध्ये झाले. पण अखेर ५५ लोकांचा मृत्यू हेही प्लेगमुळे होते का? ही शंका साथ संपल्यावर उपस्थित झाली. १९९४ चा प्लेग असो की आताच्या स्वाइन फ्लूच्या साथीतून एक धडा घ्यायला हवा की या साथीमध्ये मृत्यूचा दर कमी असूनही मृत्यूबद्दल प्रचंड भीती पसरते व भीतीपोटी उगीचच रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी लोंढे येऊन थडकतात.

एकदा एक वाघ विहिरीत डोकावतो आणि स्वत:ची सावली पाण्यात पाहून घाबरतो. घाबरून तो डरकाळी फोडतो आणि आवाजाचा प्रतिध्वनी आल्याने विहिरीत त्याला आपला कुणीतरी शत्रू असल्याचा भास होतो. त्याला मारण्यासाठी तो विहिरीत उडी घेतो आणि नसलेल्या शत्रूला मारण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू पावतो. स्वाइन फ्लू व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या भीतीत आयुष्य जगणे म्हणजे या वाघासारखे पाण्यातील सावलीला घाबरण्यासारखे आहे. स्वाइन फ्लूचे ठाऊक नाही, पण या भीतीचे जास्त दुष्परिणाम होऊ शकतात.

Contact him @ amolaannadate@yahoo.co.in

Advertisements

One Comment Add yours

  1. sunil surve says:

    please send your clinice add

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s